aniljoshi

My Photo
Name:
Location: Pandharpur, Maharashtra, India

Sunday, October 15, 2017

सरकारी वकील .....

                          सुमारे २५ वर्षे सरकारी वकील म्हणून काम करून माझे मेहूणे मुकुंदराव काणे या महिनाअखेरीस सेवा निवृत्त होत आहेत. मी आत्तापर्यंत दोन सरकारी वकील खूप जवळून पाहिले आहेत. मुकुंदराव व माझे वडील कै यशवंत गणेश उर्फ भाऊसाहेब जोशी .नंतर वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करताना अनेक वेळा साक्षीसाठी कोर्टात जावे लागले. त्या-त्या वेळी संबंधित सरकारी वकिलांशी मर्यादित संपर्क येत राहिला.भारतीय दंड संहितेनुसार एखादा गुन्हा घडल्यास फिर्याद होते. त्याच रीतसर तपास होऊन गुन्हा न्यायप्रविष्ट होतो. यात फिर्यादीच्या बाजूने जे वकील उभे राहतात त्यांना सरकारी वकील म्हणण्याची प्रथा आहे.आमच्या मुकुंदरावांना आम्ही "सरकार" या नावानेच हाक मारतो व अनेक सरकारी वकिलांनाही त्याच टोपण नावाने  संबोधिले जाते. अमिताभने साकार केलेला सरकार आपण पाहिलाय पण त्यात अमिताभ वकिलापेक्षा न्यायाधीशाच्या भूमिकेत जास्त आहे .
                          कै भाऊसाहेब हे मी पाहिलेले पहिले सरकारी वकील. खरेतर त्यांना इतिहास विषयाची प्रचंड आवड होती व त्यात  संशोधन करून  ph.D. वगैरे करावी असा त्यांचा मानस होता. पण नियतीने त्यांना सरकारी वकील केले.अत्यंत सरळमार्गी, पापभीरू व प्रामाणिक असलेले भाऊसाहेब मितभाषी होते. २०-२२ वर्षे सेवा केल्यानंतर पदोन्नती मिळून ते जिल्हा स्तरावरचे "निवड  श्रेणी वरिष्ठ पोलीसअभियोक्ता "झाले.पदनाम काहीसे क्लिष्ट असले तरी मी मुद्दाम दिले आहे.पदनामातील पोलीस हा शब्द मला अधोरेखीत करायचा आहे .काही वर्षांपूर्वीपर्यंत हे सरकारी वकील पोलीस यंत्रणेचाच एक भाग म्हणून काम करायचे .म्हणजे जिल्हा पोलीस प्रमुख यांच्या अधिपत्याखाली त्यांचे काम चालायचे .बऱ्याचवेळा पोलीस तपासाचा दर्जा काय  असतो  व हा  तपास  कसा  चालतो हे  आपणा  सर्वाना माहीत  आहेच . या तपासात अनेक  कायदेशीर  त्रुटी असतात.काहीवेळा  या त्रुटी अज्ञानजन्य  असतात तर  अनेकवेळा  या  त्रुटी जाणीवपूर्वक ठेवल्या जातात व त्यामागे एक भ्रष्ट अर्थकारण  असते .याचा  परिणाम  म्हणून वेगवेगळ्या  गुन्ह्यात आरोपींना शिक्षा  होण्याचे  प्रमाण  महाराष्ट्रात अत्यल्प असल्याचे  आपण वाचतो .विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याचे गृहमंत्रीदेखील आहेत.त्यांनी  तत्कालीन पोलीस महासंचालक  प्रवीण  दीक्षित यांच्या  मदतीने या शिक्षेच्या म्हणजेच  गुन्हा सिद्ध होण्याच्या  प्रमाणात वाढ होण्यासाठी काही जाणीवपूर्वक  प्रयत्न  केले  व त्याचा थोडाफार परिणाम  झाल्याचे  जाणवत  आहे .जिल्हा  पोलीस प्रमुख महिन्यातून एकदा जिल्हा स्तरावर एक आढावा बैठक घेतात.त्याला Crime Meeting म्हणतात.या Crime Meetingमध्ये पूर्वी सरकारी वकिलांच्या कामाचा आढावाही घेतला जायचा. या मूल्यमापनासाठी Rate Of Conviction हा निकष वापरला जायचा. म्हणजे त्या वकिलांनी चालविल्येला एकंदरीत खटल्यांपैकी किती टक्के प्रकरणात आरोपीला शिक्षा झाली .शिक्षेची टक्केवारी जितकी जास्त तितका तो वकील चांगला !!आता वरकरणी हा तर्क बरोबर वाटतो पण त्यात एक मेख आहे. तपास  करायचा तो पोलिसांनी. तो बहुतेकवेळा सदोष आणि मनमानी पद्धतीने होणार. प्रकरण न्यायप्रविष्ट होण्यापूर्वी सर्व कागदपत्रे एकदा सरकारी वकिलांना दाखवायची असा एक उपचार केला जायचा पण त्याचा फारसा परिणाम व्हायचा नाही. तपासात काही त्रुटी सरकारी वकिलांनी दाखवल्या तर त्याकडे कानाडोळा करण्याची तपासी अंमलदारांची प्रवृत्ती होती. एखाद्या धाडशी  वकिलाने  Crime Meeting मध्ये हा मुद्दा अगदी लाऊन धरला तरी जिल्हा पोलीस प्रमुखांचा कल आपल्या अधिपत्याखाली चालणाऱ्या आपल्याच यंत्रणेच्या म्हणजे पोलिसांच्या बाजूने असायचा. शिवाय तपास पूर्णत्वाला येत असताना ही छाननी होत असल्याने या त्रुटींच्या निराकरणासाठी फारसे काही होऊ शकत नसे .त्यामुळे मुळातच कच्या पायावर उभा असणारा हा डोलारा कोर्टात कोसळून आरोपी सुटायचे . या अपश्रेयाचे धनी मात्र सरकारी वकील व्हायचे .थोडक्यात तोंड दाबून बुक्यांचा मार अशी काहीशी अवस्था होती .भाऊसाहेब  सेवानिवृत्त होतेवेळी त्यांनी तत्कालीन शासनाला काही सूचना लिखित स्वरुपात केल्या होत्या .त्यामध्ये  सरकारी वकिलांच्या कामकाजावरचे पोलिसी नियंत्रण काढून त्यांची स्वत्रंत आस्थापना  निर्माण करावी अशी एक महत्वाची सूचना होती.कालांतराने ही सूचना आता प्रत्यक्षात आली असूनआता सरकारी वकील गृह खात्याच्या थेट नियंत्रणाखाली  पण पोलिसी नियंत्रणापासून पूर्णपणे मुक्त असे काम करीत आहेत .अभियोग संचालनालय Directorate of Public Prosecution असे या आस्थापनेचे नाव आहे . पूर्वीचा पोलीस अभियोक्ता आता सहाय्यक सरकारी अभियोक्ता झाला आहे. आता त्याने खऱ्या अर्थाने सर्वसामान्य जनतेची वकिली करायची आहे.
                        भाऊसाहेब सरकारी वकील असतानाच्या दोन आठवणी सांगण्यासारख्या आहेत. त्यावेळी भाऊसाहेब पुणे ग्रामीण साठी काम करीत होते.  मी त्यावेळी पुण्यात शिकत असल्याने आम्ही एकत्र राहात होतो  .एका शनिवारी सकाळी  अचानक एक पोलीस जीप दारात येऊन उभी राहिली . SP साहेबांनी तातडीने बोलावल्याचे ते फर्मान होते. भाऊसाहेबांनी त्यांची नेहमीची कागदपत्रांची बँग उचलली व ते गाडीत बसून निघून गेले . त्यावेळी आतासारखे मोबाईल वगैरे प्रकार न्हवते . रात्र झाली तरी भाऊसाहेब परतले नाहीत. बर कुठे गेलेत ...कशाला गेलेत ...काही पता नसलेने चौकशी तरी कुणाकडे करणार ? शेवटी रविवारी दुपारी  न राहवून मी राहत्या घराजवळ असलेले खडक पोलीस स्टेशन गाठले . त्यांच्या मदतीने पुणे ग्रामीण नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला  आणि सर्व खुलासा झाला . लोणावळ्यात राजकीय संघर्षातून गोळीबार झाला होता . वातावरण तंग असल्याने जिल्हा पोलीस प्रमुख भाऊसाहेबांना घेऊन तेथे तातडीने गेले होते. सोमवार रात्रीपर्यंत वकीलसाहेब घरी परत येतील असा निरोप घेऊन मी परतलो . अंगावरच्या कपड्यानिशी पिताश्री दोन दिवस लोणावळ्यात मुक्कामाला होते ! पोलीस गाडीतून मी गेल्यावर तुला इतकी काळजी करायचे काही कारण न्हवते ही त्यांची आल्यावरची प्रतिक्रिया !! स्थितप्रज्ञ म्हणजे काय त्याचा मला झालेला हा साक्षात्कार होता .
                     दुसरी घटना  गडचिरोलीची! भाऊसाहेबांची बदली गडचिरोलीला झाल्याचे ऐकून आम्ही सर्व चिंतेत होतो . भाऊसाहेब फारसा विचार न करता तेथे रुजू झाले. त्यावेळी गडचिरोली हे नुकतेच जिल्हा मुख्यालय झाले होते . सर्व प्रशासकीय इमारती नियोजनबद्ध व नव्या कोऱ्या होत्या . रुजू झाल्यावर सुमारे ८ महिन्यांनी दिवाळी सुट्टीसाठी ते घरी आले. आम्ही स्वाभाविकच त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली . त्यांनी आम्हाला असे सांगितले की नक्षलवादामुळे त्यांना तेथे फारसे कामच नाही. कारण नक्षलवाद्यांची स्वत:ची एक स्वतंत्र व क्रूर न्यायव्यवस्था आहे व तेथील जनता बंदुकीच्या धाकाने शासकीय यंत्रणेकडे येऊ दिली जात नाही . अर्थात ही फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे . आता परिस्थिती बदलली असेल अशी आशा  आहे .गडचिरोलीतील एका गावचा अत्राम (पूर्ण नाव मला आता आठवत नाही ) नावाचा एक सरपंच काही कायदेशीर सल्ला घेण्यासाठी भाऊसाहेबांना भेटून गेला. त्याच रात्री सरकारी खबऱ्या असल्याच्या संशयावरून त्याची गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली .हे ऐकून आमचा थरकाप झाला पण भाऊसाहेबांच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेश न्हवता.
                    मुकुंदरावांचे वडील कै मामासाहेब काणे हे पंढरपुरातील एक ख्यातनाम वकील.आपल्या मुलाने आपली खासगी वकिली पुढे चालवावी अशी त्यांची रास्त ईच्छा होती. त्याचा मान राखून तसा प्रयत्न मुकुंदरावांनी काही दिवस केलाही .परंतु अशिलाला फी मागायची कशी व मागितलेली फी वसूल कशी करायची हे गणित भीडस्त मुकुंदरावांना अजिबात सुटेना .शेवटी नाईलाजाने मामांनी त्यांना सरकारी वकील व्ह्यायला परवानगी दिली .मुकुंदरावांनी मग मागेपुढे न पाहता सर्वसामान्य जनतेला केंद्रस्थानी ठेऊन आपले काम अत्यंत चोखपणे केले व एक प्रकारे आपले चुलत सासरे कै भाऊसाहेब जोशी यांची परंपरा पुढे चालवली . आपली केस मुकुंदरावांपुढे येऊ नये म्हणून आरोपींचे वकील निरनिराळ्या क्लुप्त्या योजित असत इतकी त्यांची व त्यांच्या कार्यनिष्ठेची दहशत होती .
                  भाऊसाहेब ....मुकुंदराव यांच्या या प्रामाणिक सरकारी वकिलांच्या दुर्मिळ प्रजातीचे संरक्षण व संवर्धन होऊन ती वर्धिष्णू होवो ही शुभकामना !!
                                                                                          डॉ अनिल यशवंत जोशी ,पंढरपूर
                                                                                            ९४२२६४७२८३